पहिल्या अध्यायाचे महात्म्य

भगवद्‌गीता

श्री पार्वती देवी : भगवन् ! आपण सर्व तत्त्वांचे ज्ञाते आहात. आपल्या कृपेने मला श्रीविष्णू संबंधी विविध प्रकारचे धर्म ऐकायला मिळाले, जे समस्त लोकांचा उद्धार करणारे आहेत. देवेश ! आता मी गीता महात्म्य ऐकू इच्छिते ज्याचे श्रवण केल्याने

श्रीहरींची भक्ती वाढते.

श्री महादेव : ज्यांचा वर्ण अळशीच्या फुलासारखा शाम वर्णाचा आहे. पक्षीराज गरुड ज्यांचे वाहन आहे, जे निज महिम्यापासून कधी विचलित होत नाहीत तसेच शेषनागाच्या शय्येवर शयन करतात. अशा भगवान महाविष्णूंची आम्ही उपासना करतो.

एकेकाळची गोष्ट आहे. मुर दैत्याचे संहारक भगवान विष्णू शेषनागाच्या रमणीय आसनावर सुखपूर्वक विराजमान होते. त्यावेळी सर्व लोकांना आनंद देणाऱ्या भगवती लक्ष्मीने आदराने प्रश्न विचारला.

श्री लक्ष्मी ने विचारले : भगवन ! आपण सर्व जगाचे पालनकर्ते असूनही आपल्या ऐश्वर्याप्रती उदासीन होऊन या क्षीरसागरात शयन करीत आहात, याचे काय कारण आहे ?

श्री भगवान : सुमुखी! मी शयन करीत नसून, तत्वाचे अनुसरण करणाऱ्या अंतर्दृष्टी द्वारे माझ्याच महेश्वर तेजाचा साक्षात्कार करीत आहे. हे तेच तेज आहे, ज्याचे योगीपुरुष कुशाग्र बुद्धी द्वारे त्यांच्या अंतःकरणात दर्शन करतात तसेच ज्याला मीमांसक विद्वान वेदांचे सार तत्व निश्चित करतात. असे माहेश्वर तेज एक, अजर,प्रकाश स्वरूप, आत्मरूप रोग-शोक रहित, अखंड आनंदाचा समुदाय, निराकार तसेच द्वैत रहीत आहे.

या जगताचे जीवन त्याच्याच आधीन आहे मी त्याचाच अनुभव करीत आहे. देवेश्वरी!

याच कारणास्तव मी तुला शयन करताना दिसत आहे.

श्री लक्ष्मी : ऋषिकेश! आपणच योगी पुरुषांचे ध्येय आहात. आपल्या व्यतिरिक्त देखील दुसरे ध्यान करण्यायोग्य तत्व आहे हे जाणून मला खूप कुतूहल वाटत आहे या चराचर जगताची सृष्टी आणि संहार करणारे स्वतः आपणच आहात. आपण सर्वसमर्थ आहात. अशा प्रकारच्या स्थितीमध्ये असूनही जर आपण त्या परमतत्त्वापासून भिन्न आहात तर मला त्याचा बोध करावा.

 श्री भगवान : प्रिय आत्म्याचे स्वरूप द्वैत आणि अद्वैता पासून पृथक (वेगळे), भाव आणि अभावा पासून मुक्त तसेच आदी आणि अंत यांपासून रहित आहे. शुद्ध ज्ञानाच्या प्रकाशापासून उपलब्ध होणारे व परमानंद स्वरूपात असल्यामुळे एकमेव सुंदर आहे. तेच माझे ईश्वरीय रूप आहे. आत्म्याचे एकत्वच सर्वाद्वारे जाण्यायोग्य आहे. गीता शास्त्रात याचेच प्रतिपादन केलेले आहे. अमित तेजस्वी भगवान विष्णूंचे हे वचन ऐकून लक्ष्मी देवी शंका उपस्थित करीत म्हणाल्या : भगवान ! जर आपले स्वरूप स्वयम् परमानंदमय मन-वाणीच्या पलीकडील आहे तर मग गीता त्या स्वरुपाचा बोध कसा करावीते ? आपण माझ्या या शंकेचे निरसन करावे.

श्री भगवान : सुंदरी ! ऐक मी गीतेमध्ये माझ्या स्थितीचे वर्णन करीत आहे अनुक्रमे पाच अध्यायांना  तू पाच मुखे समज, दहा अध्यायांना दहा हात समज तसेच एका अध्यायाला पोट आणि दोन अध्यायांना दोन्ही चरणकमल समज. अशाप्रकारे या अठरा अध्यायांची वांग्मयी ईश्वरीय मूर्ती समजले पाहिजे.

ही केवळ ज्ञानानेच महान पातकांचा नाश करणारी आहे. जो उत्तम बुद्धीचा पुरुष गीतेच्या एका अथवा अर्ध्या अध्यायाचे किंवा एक, अर्धा किंवा चतुर्थांश भागाच्या श्लोकाचे दररोज अभ्यास करतो तो सुशर्मा समान मुक्त होऊन जातो.

श्री लक्ष्मी : देव ! सुशर्मा कोण होता ? कोणत्या जातीचा होता आणि कोणत्या कारणाने त्याची मुक्ती झाली ?

श्री भगवान : प्रिये ! सुशर्मा अत्यंत कपटी बुद्धीचा व महापापी माणूस होता. त्याचा जन्म वैदिक ज्ञानाने शून्य व क्रूरपणे कर्म करणार्‍या ब्राह्मणांच्या कुळात झाला होता. तो कधी जप ध्यान करीत नसे. होम हवन करीत नसे व कधी अतिथींचा सत्कारही करीत नसे. तो लंपट असल्याने सदैव भोग विलासातच आसक्त राहत असे. नांगर चालवून आणि पाने विकून उपजीविका चालवीत असे त्याला मद्याचे व्यसन होते तसेच तो मांस सुद्धा खात असे. अशा प्रकारे त्याने आयुष्याचा दीर्घ काळ व्यतीत केला. एकेदिवशी मूड बुद्धी सुशर्मा पाने घेण्यासाठी कोण्या ऋषीच्या वाटीकेत फिरत होता.

इतक्यात काळ रूप धारी काळया सर्पाने त्याला दंश केला. सुशर्माचा मृत्यू झाला. त्यानंतर तो अनेक नर्कामध्ये जाऊन, तेथील यातना भोगून मृत्यूलोकात परत आला आणि तेथे ओझं वाहणारा बैल बनला. त्यावेळी एका अपंगाने स्वतःचे जीवन आरामात घालवण्यासाठी त्याला खरेदी केले. बैलाने अपंगाचा भार पाठीवर वाहत खूप कष्ट सहन करीत सात-आठ वर्षे घालविली. एके दिवशी त्या अपंगाने एका उंच ठिकाणावर बराचवेळ पर्यंत वेगाने त्या बैलाला फिरवले त्यामुळे तेथे तो थकून खूप वेगाने जमिनीवर पडला आणि बेशुद्ध झाला. त्यावेळी तेथे कुतुहलाने बरेच लोक एकत्रित झाले. त्या जनसमुदायातील एका पुण्यात्मा व्यक्तीने त्या बैलाचे कल्याण करण्यासाठी त्याला स्वतःचे पुण्य दान केले. त्यानंतर काही दुसऱ्या लोकांनी सुद्धा आपापल्या पुण्यांची आठवण करून ते त्याच्यासाठी दान केले.

                                     त्या गर्दी मध्ये एक वैश्या सुद्धा उभी होती. तिला तिचे पुण्य माहीत नव्हते, तरीही तिने लोकांचे पाहून त्या बैलासाठी थोडे पुण्य दान केले. त्यानंतर यमराजाचे दूत त्या मृत प्राण्याला प्रथम यमपुरीत घेऊन गेले. तेथे या वैश्येने दिलेल्या पुण्यामुळे हा पुण्यवान झाला आहे असा विचार करून त्याला सोडण्यात आले. नंतर तो भूलोकात येऊन उत्तम कुळ आणि शील असणाऱ्या ब्राह्मणाच्या घरात जन्माला आला. त्यावेळी देखील त्याला त्याच्या पूर्वजन्मीच्या गोष्टींचे स्मरण झाले. अनेक दिवसानंतर स्वतःचे अज्ञान दूर करणाऱ्या कल्याण तत्वाचा जिज्ञासू होऊन तो त्या वैश्येकडे गेला आणि तिच्या पुण्य दानाची गोष्ट सांगून तिला विचारले : ‘ तू कोणते पुण्य दान केले होतेस ?’ वैश्येने उत्तर दिले : ‘ हा पिंजऱ्यात बसलेला पोपट दररोज काहीतरी बोलतो त्यामुळे माझे अंतःकरण पवित्र झाले आहे. त्याचे पुण्य मी तुझ्यासाठी दान केले होते.’ त्यानंतर त्या दोघांनी पोपटाला विचारले.  तेव्हा त्या पोपटाने त्याच्या पूर्वजन्मीचे स्मरण करीत प्राचीन इतिहास सांगण्यास सुरुवात केली.

पोपट : ‘ पूर्वजन्मी मी विद्वान असूनही विद्वत्तेच्या अभिमानाने मोहित झालो होतो माझा मोह व द्वेष इतका वाढला होता की मी गुणवान विद्वानांचा देखील मत्सर करू लागलो. कालांतराने माझा मृत्यू झाला आणि मी अनेक घृणित(तिरस्कृत) योनीमध्ये भटकत राहिलो त्यानंतर इहलोकात आलो. सद्गुरूंची अतिशय निंदा केल्याने पोपटाच्या कुळात माझा जन्म झाला. पापी असल्यामुळे लहान अवस्थेतच आई – वडिलांपासून माझा वियोग झाला. एके दिवशी मी ग्रीष्म ऋतूमध्ये तापलेल्या मार्गावर पडलो होतो तेथून काही श्रेष्ठ मुनी मला घेऊन आले आणि महात्म्यांच्या सानिध्यात आश्रमामध्ये एक पिंजऱ्यात मला ठेवले. तेथेच मला शिकविण्यात आले. ऋषींची मुले खूप आदराने गीतेच्या पहिल्या अध्यायाचे पाठांतर करीत असत. ते ऐकून मी सुद्धा सारखे पाठांतर करू लागलो. या दरम्यान चोरी करणाऱ्या पारध्याने मला तेथून चोरले. त्यानंतर या देवीने मला खरेदी केले. असा माझा वृत्तांत मी तुम्हाला सांगितला. पूर्वीच्या काळी मी पहिल्या अध्यायाचा अभ्यास केला होता म्हणून माझे पाप दूर झाले आहे. नंतर त्याचमुळे या वैश्येचे सुद्धा अंतकरण शुद्ध झाले आणि त्याच पुण्याईने हे ब्राह्मण श्रेष्ठ सुशर्मा देखील पापमुक्त झाले आहेत.

अशाप्रकारे परस्पर चर्चा आणि गीतेचा पहिला अध्याय महात्म्याची प्रशंसा करून ते तिघे आपापल्या घरी गीतेचा अभ्यास करू लागले नंतर ज्ञान प्राप्त करून ते मुक्त झाले. म्हणून जो गीतेचा पहिला अध्याय वाचतो, ऐकतो किंवा अभ्यास करतो त्याला हा भवसागर पार करण्यास कोणतीही अडचण येत नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*