पहिला अध्याय : अर्जुनविषादयोग

भगवद्‌गीता

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण विश्वाला गीतेच्या स्वरूपात जो महान उपदेश दिला आहे, हा अध्याय त्याची प्रस्तावनाच आहे . त्यात दोन्ही पक्षांतील मुख्य योद्धांची नावे सांगितल्यानंतर मुख्यतः अर्जुनाला कुटुंबनाशाच्या शंकेमुळे उत्पन्न झालेल्या मोहयुक्त विषादचे वर्णन आहे.

धृतराष्ट्र : हे संजय धर्मभूमी कुरुक्षेत्रात एकत्रित झालेल्या युद्धाची ,इच्छा करणाऱ्या माझ्या व पांडूच्या पुत्रांनी काय केले? II 111

संजय : त्यावेळी पांडवांच्या सैनिकांची व्यूव्हरचना पाहून दुर्योधन द्रोणाचायांजवळ जाऊन असे म्हणाला :

II 2 II

हे आचार्य ! तुमचे बुद्धिमान शिक्षण द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न याने कौशल्याने उभी केलेली पांडूच्या पुत्रांची भलीमोठी सेना पहा. II 3 II

या सेनेमध्ये मोठेमोठे धनुर्धर तसेच या युद्धात भीम आणि अर्जुन यांसारखे शूरवीर सात्यकी आणि विराट व महारथी राजा द्रुपद दृष्टकेतू आणि चेकितान तसेच बलवान काशीराज ,पुरूजीत , कुंतिभोज आणि मनुष्यामध्ये श्रेष्ठ असणारा श्येब्य, पराक्रमी असा युद्धामन्यू तसेच बलवान उत्तमोजा ,सुभद्रेचा पुत्र अभिमन्यु त्याचबरोबर द्रौपदीचे पाचही पुत्र हे सर्व महारथी आहेत. II 4, 5, 6 II

हे ब्राह्मणश्रेष्ठ !  आपल्या सैन्यात देखील चे मुख्य आहेत त्यांना तुम्ही जाणून घ्या. तुमच्या माहितीसाठी माझ्या सेनेमध्ये जे-जे सेनापती आहेत, त्यांची नावे सांगतो. II 7 II

येथे आपण स्वतः द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म तसेच कर्ण आणि संग्राम विजयी कृपाचार्य त्याचबरोबर अश्वत्थामा ,विकर्ण आणि सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा इत्यादी योद्धे आहेत. II 8 II

अजूनही माझ्यासाठी स्वतःचा प्राण ओवाळून टाकणारे बरेचसे शूरवीर अनेक प्रकारच्या शस्त्र-अस्त्रांनी सुसज्जित असे योद्धे येथे आहेत आणि ते सर्वजण युद्ध कलेमध्ये चतुर व कुशल आहेत. II 9 II

पितामह भीष्म यांच्याद्वारे रक्षण केलेली आपली अमर्याद सेना सर्वप्रकारे सुरक्षित आणि विजयी ठरणारी आहे. आणि भीमा द्वारे रक्षण केलेली या लोकांची ही मर्यादित सेना युद्धात जिंकण्यासाठी सुलभ आहे.

II 10 II

म्हणून सर्व प्रवेशद्वारांवर आपापल्या नेमलेल्या जागेवरच स्थिर राहून तुम्ही सर्व लोकांनी नि:संदेहपणे पितामह भीष्म यांचे सर्व बाजूंनी रक्षण करावे. II 11 II

 कौरांवांमध्ये वयोवृद्ध, प्रतापवान पितामह भीष्मांनी दुर्योधनाला हर्षित करण्यासाठी उच्च स्वरांमध्ये सिंहगर्जने प्रमाणे गर्जना करीत मोठ्याने शंख वाजविला. II 12 II

 त्यानंतर अनेक शंख ,नगारे ,ढोल ,मृदंग आणि रणशिंगे इत्यादी सर्व वाद्ये एकाच वेळी वाजू लागली ,तेव्हा त्यांचा तो एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता. II 13 II

 त्यानंतर पांढर्‍याशुभ्र घोड्यांनी युक्त अशा उत्तम रथात बसलेले श्रीकृष्ण महाराज आणि अर्जुन यांनीसुद्धा अलौकिक शंख वाजविले. II 14 II

 श्रीकृष्ण महाराजांनी पांचजन्य शंख नावाचा ,अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक असे कर्म करणार्‍या भीमसेनाने पौंड्र नावाचा महाशंख वाजविला. II 15 11

 कुंतीपुत्र राजा युधिष्ठिर आणि अनंत विजय नावाचा आणि नकुल तसेच सहदेवाने सुघोष व मणिपुष्पक नावाचा शंख वाजविला. II 16 II

 हे राजन ! श्रेष्ठ धनुर्धर काशीराज , महारथी शिखंडी तसेच दृष्टद्युम्न विराट राजा आणि अजय सात्यकी , द्रुपद राजा त्याचबरोबर द्रौपदीचे पाच पुत्र आणि आजानुबाहू सुभद्रापुत्र अभिमन्यु या सर्वांनी वेगवेगळे शंख वाजविले .  II 17, 18 II

आणि त्या भयानक आवाजाने आकाश आणि पृथ्वीला सुद्धा दुमदुमून टाकीत धृतराष्ट्रांची अर्थात तुमच्या पक्षातील लोकांची हृदये विदिर्ण केली II 19 II

 हे राजन यानंतर कपिध्वज अर्जुन युद्धासाठी सज्ज कौरवांना पाहून शास्त्र चालविण्याच्या वेळी धनुष्य हाती घेऊन ऋषिकेश श्री कृष्ण महाराजांना म्हणाले : हे अच्युता ! माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा करा. II 20, 21 II

 जोपर्यंत मी या युद्धात सहभागी झालेल्या ,युद्धाची अभिलाषा असणाऱ्या योध्यांचे निरीक्षण करीत नाही की, मला या रणसंग्रामरुपी व्यापारामध्ये कोण कोणाची युद्ध करणे योग्य आहे, तोपर्यंत माझा रथ उभा करा. II 22 II

 दुर्बुद्धी दुर्योधनाचे युद्धात हित चिंतणारे हे जे-जे राजे लोक या सैन्यामध्ये आले आहेत, त्या युद्ध करणाऱ्यांना मी पाहीन. II 23 II

 संजय : हे धृतराष्ट्र ! अशाप्रकारे अर्जुनाने सांगितल्यावर महाराज श्री कृष्णचंद्र दोन्ही सैन्याच्या मध्ये भीष्मा आणि द्रोणाचार्य च्या समोर तसेच सर्व राजांच्या समोर आपला उत्तम रथ उभा करीत म्हणाले की : हे पार्थ ! युध्दासाठी जमलेल्या कौरवांना पहा. II 24, 25 II

 यानंतर पृथापुत्र अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यामध्ये उपस्थित वडील माणसे, काका, आजोबा-पणजोबा, आचार्य, मामा ,बंधू ,मित्र , सासरे आणि आप्तेष्ठांना पाहिले त्या उपस्थित सर्व बांधवांकडे पाहून कुंतीपुत्र अर्जुन अत्यंत करुणेने व्याकुळ होऊन शोक करीत असे म्हणाले : II 26,27 II

अर्जुन :  हे कृष्ण युद्धक्षेत्रामध्ये जमलेले ,युद्धाची अभिलाषा असणाऱ्या सर्व जनसमुदायाला पाहून माझी गात्रे शिथिल होऊ लागले आहेत आणि माझा घसा कोरडा पडू लागला आहे व शरीरात कंपन होऊन अंग रोमांचित होत आहे. II 28, 29 II

 हातातून गांडीव धनुष्य खाली पडत आहे आणि त्वचेचा ही खूप दाह होत आहे. तसेच माझे मन भ्रमीत होत आहे. म्हणून मी या युद्धात उभा देखील राहू शकत नाही. II 30 II

 हे केशव ! मला सर्व लक्षणे विचित्र दिसत आहेत आणि युद्धा मध्ये स्वजनांना मारून कल्याण दिसत नाही. II 31 II

हे कृष्ण !  मला विजय आणि राज्यही नको आणि सुखही नको हे गोविंद स्वजनांना मारून मिळणाऱ्या राज्यापासून मला काय करायचे आहे ?  आणि अशा प्रकारच्या सुख- भोगयुक्त जीवनापासून मला काय फायदा आहे ?  II 32 II

आम्हाला ज्याच्यासाठी काहीतरी मिळावे अशी इच्छा आहे ते सर्वजण आपले धन आणि जीवनाच्या आशेचा त्याग करून युद्धात उभे आहेत. II 33 II

 गुरुजन ,काका, मुले त्याचप्रमाणे आजोबा ,मामा, सासरे ,नातू तसेच आणखीनही हितसंबंधी लोक आहेत.

  II 34 II

मधुसूदन !  त्यांनी मला मारले तरी किंवा ती लोकीचा राज्यासाठी देखील मी या सर्वांना मारू इच्छित नाही मग पृथ्वीसाठी तर आणखीन काय सांगू ? II 35 II

 हे जनार्दन ! धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्हाला काय आनंद मिळणार आहे  ? या अतातायीना मारून तर आम्हाला पापच लागेल. II 36 II

म्हणून हे माधव !  आपलेच बांधव असणाऱ्या धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारणे आमच्यासाठी योग्य नाही, कारण आपल्याच कुटुंबीयांना मारून आम्ही कसे सुखी होऊ शकतो ? II 37 II

 जरी लोभामुळे बुद्धिभ्रष्ट झालेले हे लोक कुळाचा नाश केल्याने उत्पन्न होणारे दोष आणि मित्रांशी विरोध केल्याने होणारे पाप पाहत नसतील, तरीसुद्धा हे जनार्दन ! कुळाचा नाश केल्याने उत्पन्न होणाऱ्या दोषांना आम्ही जाणत असूनही या  पापा पासून दूर होण्यासाठी का विचार करू नये ? II 38, 39 II

कुळाचा नाश केल्याने कुळाचे सनातन धर्म नष्ट होऊन जातात , धर्माचा नाश झाल्यामुळे संपूर्ण कोणावर पापरुपी अधर्माचाच पगडा बसतो. II 40 II

 हे कृष्ण ! पाप अधिक वाढत गेल्यामुळे कुळातील स्त्रिया दुराचारी होऊन जातात आणि हे स्त्रिया दुराचारी झाल्यामुळे वर्णसंकर संतती उत्पन्न होते . II 41 II

वर्ण संकरित प्रजा कुळाचा घात करण्यासाठी आणि कुणाला नरकामध्ये घेऊन जाण्यासाठीच असते.

पिंडदान , श्राद्ध ,तपर्णादि क्रिया लोक पावल्यामुळे त्यांचा पितरांची देखील अधोगती होते. II 42 II

 या वर्ण संकराच्या दोषामुळे कुळाचा घात करणाऱ्यांचे सनातन कुळ-धर्म आणि जाती-धर्म नष्ट होऊन जातात. II 43 II

हे जनार्दन ! ज्याचा कुळ धर्म नष्ट झालेला आहे अशा लोकांना अनिश्चित काळापर्यंत नरकवास भोगावा लागतो असे आम्ही ऐकत आलो आहोत. II 44 II

 अरेरे ! किती खेदाची गोष्ट आहे की आम्ही लोक बुद्धिमान असूनही महान पाप करण्यास तयार झालो आहोत, कारण राज्य आणि सुखाच्या लोभाने स्वजनांना मारण्यास तयार झालो आहोत. II 45 II

 तरी नि:शस्त्र प्रतिकार करणाऱ्या मला शस्त्रधारी कौरव रणभूमीवर मारतील तरी ते मरण सुद्धा माझ्यासाठी अधिक कल्याणकारक होईल. II 46 II

 संजय : रणभूमीमध्ये शोकाकुल झालेल्या अर्जुनाने अशा प्रकारे बोलून बाणांसह धनुष्य टाकून दिले आणि रथाच्या मागच्या बाजूला जाऊन बसले. II 47 II

 अशाप्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी श्रीमद्भगवद्‌गीतेच्या श्रीकृष्ण-अर्जुन संवादात ‘अर्जुनविषादयोग’ हा पहिला अध्याय समाप्त झाला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*