दुसऱ्या अध्यायाचे महात्म्य : श्रीमदभगवतगीता

भगवद्‌गीता

दुसऱ्या अध्यायाचे महात्म्य : श्रीमदभगवतगीता

श्री भगवान : लक्ष्मी ! पहिल्या अध्यायाच्या महात्म्याचे उत्तम उपाख्यान मी तुला ऐकवले आहे.

आता अन्य अध्यायांचे महात्म्य श्रवण कर.

दक्षिण दिशेला वेदवेत्त्या ब्राह्मणांच्या पुरन्दरपुर नावाच्या नगरात श्रीमान देवशर्मा नावाचे एक विद्वान ब्राह्मण राहत होते.

ते अतिथींचे पूजक, स्वाध्यायशील वेद शास्त्रांचे विद्वान यज्ञांचे अनुष्ठान करणारे आणि तपस्व्यांचे सदैव प्रिय होते. त्यांनी उत्तम द्रव्यांद्वारे अग्नीमध्ये हवन करून दीर्घकाळापर्यंत देवांना तृप्त केले. परंतु त्या धर्मात्मा ब्राह्मणाला कधी सदैव राहणारी शांती मिळाली नाही. ते परम कल्याणमय तत्त्वाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी दररोज योग्‍य साधनसामुग्री द्वारे सत्य संकल्पवान तपस्व्यांची सेवा करू लागले. अशाप्रकारे शुभ आचरण करीत त्यांचा बराच काळ निघून गेला. त्यानंतर एके दिवशी पृथ्वीवर त्यांच्यासमोर एक त्यागी महात्मा प्रगट झाले. ते पूर्ण अनुभवी आकांक्षा रहित नाकाच्या अग्र भागावर दृष्टी ठेवणारे तसेच शांतचित्त होते. निरंतर परमात्म चिंतनामध्ये संलग्न राहून ते सदैव आनंद मग्न राहत असत. देव शर्माने त्या नित्य संतुष्ट तपस्वीला शुद्ध भावाने नमस्कार केला.

आणि विचारले : ‘ महात्मन ! मला शांतीमय स्थिती कशी प्राप्त होईल ?’ तेव्हा त्या आत्मज्ञानी संताने देव शर्माला सौपूर गावातील निवासी मित्रवानचा जो मेंढपाळ होता त्याचा परिचय दिला आणि सांगितले : ‘ तो तुम्हाला उपदेश देईल.’

हे ऐकून देव शर्माने माहात्म्यास नमस्कार केला आणि समृद्ध शाली सौपूर गावामध्ये पोहोचून त्याच्या उत्तर भागामध्ये एक विशाल वन पाहिले.

त्या वनांमध्ये नदीच्या काठी एका शिळेवर मित्रवान बसला होता. त्याचे डोळे अति आनंदाने निश्चल झाले होते. तो एकटक नजरेने पाहत होता. त्या वनात आपसातील स्वाभाविक वैर सोडून एकत्रित झालेल्या परस्पर विरोधी प्राण्यांचे वास्तव्य स्थान होते. तेथे उद्यानामध्ये मंद मंद वारा वाहत होता. हरणांचे कळप शांतपणे बसले होते आणि दयाळू मित्रवान आनंदमय मनोहारीनी दृष्टीने पृथ्वीवर जणू अमृत सिंचन करीत होता. या रूपामध्ये त्याला पाहून देव शर्माचे मन प्रसन्न झाले.

ते उत्सुक होऊन खूप नम्रपणे मित्रवानाच्या जवळ गेले. मित्र वानाने सुद्धा आपले मस्तक थोडेसे झुकवून देवशर्मा चा सत्कार केला. त्यानंतर विद्वान देव शर्मा अनन्य चित्ताने मित्रवान जवळ गेले आणि जेव्हा त्यांच्या ध्यानाची वेळ संपली, त्यावेळी त्यांनी त्यांच्या मनातील गोष्ट विचारली : ‘ महाभाग ! मी आत्म्याचे ज्ञान प्राप्त करु इच्छितो. माझे हे मनोरथ पूर्ण करण्यासाठी मला अशा उपायांचा उपदेश करा ज्याच्या द्वारे सिद्धी प्राप्त होते.’

देवशर्माचे बोलणे ऐकून मित्रवानने क्षणभर थोडा विचार केला. त्यानंतर असे म्हणाला : ‘ हे विद्वान ! एकेकाळची गोष्ट आहे. मी वनांमध्ये शेळ्यांची राखण करीत होतो. तेवढ्यात एका भयंकर वाघावर माझी दृष्टी पडली, जो सगळ्यांना खाऊ इच्छित होता. मी मृत्युला भीत होतो, त्यामुळे वाघाला येताना पाहून शेळ्यांच्या कळपाला पुढे करून तेथून पळून गेलो. परंतु एक शेळी लगेचच निर्भयपणे सगळी भीती सोडून नदीच्या किनारी त्या वाघा जवळ गेली. नंतर वाघ सुद्धा द्वेष सोडून गुपचूप उभा राहिला.

त्याला या अवस्थेमध्ये पाहून शेळी म्हणाली : ‘ वाघा ! तुला तर इच्छित भोजन प्राप्त झाले आहे माझ्या शरीरातून मांस काढून प्रेमपूर्वक खा ना ! तू अजून पर्यंत उभा का आहेस ? तुझ्या मनात मला खाण्याचा विचार का येत नाही ?

वाघ :  ‘शेळी ! या जागेवर येताच माझ्या मनातील द्वेषभाव निघून गेला. भूक-तहान सुद्धा शमली. त्यामुळे जवळ येऊनही आता मी तुला खाऊ इच्छित नाही. वाघाने असे म्हटल्यावर शेळी म्हणाली : ‘कुणास ठाऊक मी कशी निर्भय झाले आहे, याचे काय कारण असू शकते ? जर तुला माहित असेल तर सांग.’ हे ऐकून वाघ म्हणाला : ‘मला सुद्धा ठाऊक नाही चल, समोर उभ्या असलेल्या या महापुरुषाला विचारू.’

असा निश्चय करून ते दोघे तेथून निघाले. त्या दोघांच्या स्वभावात हे विचित्र परिवर्तन पाहून मी खूप आश्चर्यचकित झालो. एवढ्यात त्यांनी येऊन मलाच प्रश्न विचारला. तेथे झाडाच्या फांदीवर एक वानरराज होता. त्या दोघांच्या बरोबर मी सुद्धा वानरराजाला विचारले. विप्रवर मी विचारल्यावर वानरराज आदरपूर्वक म्हणाले : ‘अजापाल ! ऐका. याविषयी मी तुम्हाला प्राचीन वृत्तांत ऐकवतो. येथे समोर वनामध्ये जे खूप मोठे मंदिर आहे, त्यांच्याकडे पहा. त्यामध्ये ब्रह्मदेवाने स्थापित केलेले एक शिवलिंग आहे.

पूर्वीच्या काळी येथे सुकर्मा नावाचे एक बुद्धिमान महात्मा राहत असत. जे तपश्चर्येमध्ये संलग्न होऊन या मंदिरांमध्ये उपासना करीत असत. नदीतील पाण्याने पूजनीय भगवान शंकराला स्नान घालून वनातून वेचून आणलेल्या फुलांनी त्यांची पूजा करीत असत. अशा प्रकारे आराधनेचे कार्य करीत सुकर्मा येथे राहत असत बऱ्याच वर्षानंतर त्यांच्याकडे कोण्या अतिथीचे आगमन झाले. सुकर्माने भोजनासाठी फळे आणून अतिथीला अर्पण केली आणि म्हणाले : विद्वान ! मी केवळ तत्त्वज्ञानाचा इच्छेने भगवान शंकराची आराधना करीत आहे.

आज या आराधनेचे फळ परिपक्व होऊन मला मिळाले कारण यावेळी आपल्यासारख्या महापुरुषाने माझ्यावर कृपा केली आहे.’ सुकर्माचे हे मधुर वचन ऐकून तपश्चर्येचे धनी महात्मा अतिथी खूप प्रसन्न झाले. त्यांनी एका शिळेवर गीतेचा दुसरा अध्याय लिहिला आणि ब्राह्मणाला त्याचा पाठ अथवा अभ्यास करण्याची आज्ञा देत म्हणाले : ‘ब्राम्हण ! यामुळे तुमचे आत्मज्ञाना संबंधीचे मनोरथ आपोआपच सफल होईल.’

एवढे सांगून ते बुद्धिमान तपस्वी सुकर्माच्या समोर पाहता-पाहता अंतर्धान पावले. सुकर्मा आश्चर्यचकित होऊन त्यांच्या आदेशानुसार निरंतर गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास करू लागले. त्यानंतर दीर्घ काळाने अंतःकरण शुद्ध होऊन त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. नंतर ते जेथे जेथे गेले. तेथील तपोवन शांत झाले त्यांच्यातील शीत उष्ण आणि राग द्वेष इत्यादींची बाधा दूर झाली. एवढेच नव्हे त्या स्थाना मध्ये भूक-तहान यांचेही कष्ट दूर झाले. तसेच भीतीचा सगळीकडे अभाव झाला. हा सर्व दुसऱ्या अध्यायाचा जप करणाऱ्या सुकर्मा ब्राह्मणाच्या तपश्चर्येचाच प्रभाव समजा.

मित्रवान म्हणतो : ‘वानरराजाच्या या सांगण्यावरून मी प्रसन्नता पूर्वक शेळी आणि वाघ यांच्या बरोबर त्या मंदीराच्या दिशेने गेलो. तेथे जाऊन शिलाखंडावर लिहिलेला गीतेचा दुसरा अध्याय मी पाहिला आणि वाचला. त्याचीच आवर्तने केल्याने मी तपश्चर्येच्या पलीकडचे ज्ञान प्राप्त केले आहे. आता भद्रपुरुषा तुम्हीसुद्धा सदैव दुसऱ्या अध्यायाचेच आवर्तन करीत राहा. असे केल्यावर मुक्ती तुमच्यापासून दूर राहणार नाही.

श्री भगवान सांगतात : ‘’ प्रिये  !  मित्रवानाने अशाप्रकारे आदेश दिल्यानंतर देव शर्माने त्यांची पूजा केली आणि त्यांना नमस्कार करून पुरंदरपुरची वाट धरली. तेथे एका मंदिरात पूर्वोक्त आत्मज्ञानी पुरुषाला पाहून त्यांनी हा संपूर्ण वृत्तांत सांगितला आणि सर्वप्रथम त्यांच्याकडून दुसऱ्या अध्यायाचे उच्चारण करविले. त्यांच्या उपदेशानुसार शुद्ध अंतःकरणाचे देव शर्मा दररोज अत्यंत श्रद्धेने दुसऱ्या अध्यायाचा पाठ करू लागले तेव्हापासून त्यांनी प्रशंसा करण्यायोग्य परमपदाची प्राप्ती केली लक्ष्मी ! हे दुसऱ्या अध्यायाचे उपाख्यान सांगितले आहे.

दुसऱ्या अध्यायाचे महात्म्य : श्रीमदभगवतगीता

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*