
श्री पृथ्वीदेवीने विचारले
हे भगवंता ! हे परमेश्वरा ! हे प्रभो ! प्रारब्ध कर्म भोगत असताना मनुष्याला एकनिष्ठ भक्ती कशी प्राप्त होते ? II1II
श्री विष्णू भगवान म्हणाले
प्रारब्ध भोगत असताना जो मनुष्य सदैव श्री गीतेच्या अभ्यासात रत असतो तोच ईहलोकी मुक्त होऊन सुखी होतो आणि कर्मामध्ये लेपायमान होत नाही .II2II
ज्याप्रमाणे कमळाच्या पानांना पाणी स्पर्श करीत नाही त्याचप्रमाणे जो मनुष्य श्री गीतेचे ध्यान करतो त्याला महापापा सारखी पापे कधी स्पर्श करीत नाहीत II3II
जेथे श्रीगीतेचे पुस्तक असते आणि जेथे श्री गीतेचा पाठ होतो तेथे प्रयाग आदी सर्व तीर्थे निवास करतात II4II
जेथे श्री गीता आहे तेथे सर्व देव, ऋषी, योगी, नाग आणि गोपाळ बाळ श्रीकृष्ण देखील नारद, ध्रुव आणि सर्व पार्षदासह त्वरित सहाय्यक होतात II5II
जेथे श्री गीतेचा विचार वाचन मनन तसेच श्रवण होते तेथे हे पृथ्वी ! मी अवश्य निवास करतो II6II
मी श्री गीतेच्या आश्रयाला राहतो, श्री गीता माझे उत्तम घर आहे आणि श्रीगीता ज्ञानाच्या आश्रयाने मी त्रैलोक्याचे पालन करतो II7II
श्री गीता अती अवर्णनीय पदरचनायुक्त, अविनाशी, अर्ध मात्रा तसेच अक्षर स्वरूप नित्य ब्रम्हरूपिनी आणि माझी परम श्रेष्ठ विद्या आहे यात संशय नाही II8II
ती श्री गीता चिदानंद श्रीकृष्णांनी स्वतःच्या स्वमुखाने अर्जुनाला सांगितलेली तसेच तिन्ही वेद स्वरूप परमानंद स्वरूप व तत्वरुप पदार्थाच्या ज्ञानाने युक्त आहे II9II
जो मनुष्य एकाग्रचित्ताने नित्य श्री गीतेच्या अठरा अध्यायांचा जप-पाठ करतो तो ज्ञानरूप सिद्धीस प्राप्त होऊन परम पदास प्राप्त होतो II10II
संपूर्ण पाठ करण्यात असमर्थ असाल तर अर्धा पाठ करावा तरीदेखील गोदानाचे पुण्य मिळते यात संशय नाही II11II
तिसऱ्या भागाचा पाठ केला तर गंगा स्नानाचे फळ मिळते आणि सहाव्या भागाचा पाठ केला तर सोम यागाचे फळ मिळते II12II
जो मनुष्य भक्ती भावपूर्वक नित्य एका अध्यायाचा पाठ करतो तो रुद्र लोकास प्राप्त होतो आणि तेथे शिवाचा गण बनून चिरकाल वास्तव्य करतो II13II
हे पृथ्वी ! जो मनुष्य नित्य एक, अध्याय एक श्लोक अथवा श्लोकाचा एक चतुर्थांश भाग पाठ करतो तो मन्वंतरापर्यंत मनुष्यात्वास प्राप्त होतो II14II
जो मनुष्य गीतेच्या दहा, सात, पाच, चार, तीन, दोन, एक किंवा अर्ध्या श्लोकाचा पाठ करतो तो अवश्य दहा हजार वर्षापर्यंत चंद्र लोकास प्राप्त होतो.गीतेचा पाठ करत असलेल्या मनुष्याचा जर मृत्यू झाला तर तो (पशू इत्यादी अधम योनीमध्ये न जाता) पुन्हा मनुष्य जन्मास प्राप्त होतो II15II
(आणि तेथे )गीतेचा पुन्हा अभ्यास करून उत्तम मुक्ती प्राप्त करतो. गीता असे उच्चारण करून जो मरतो तो सदगतीस प्राप्त होतो II16II
गीतेचा अर्थ ऐकण्यास तत्पर असलेला मनुष्य महापापी असला तरीही तो वैकुंठास प्राप्त होतो आणि विष्णू सोबत आनंदित राहतो. II17II
अनेक कर्मे करून नित्य श्री गीतेच्या अर्थाचा जो विचार करतो त्याला जीवन मुक्त समजा.मृत्यूनंतर तो परम पद प्राप्त करतोII18II
गीतेचा आश्रय घेऊन जनकादी कित्येक राजे पाप रहित होऊन इहलोकी यशस्वी होऊन परम पदास प्राप्त झाले आहेत II19II
श्री गीतेचे वाचन करून जो महात्म्याचे वाचन करीत नाही त्याचे वाचन निष्फळ ठरते आणि अशा वाचनाला श्रम रूप म्हटले आहे II20II
या महात्म्या सहित श्री गीतेचा जो अभ्यास करतो त्याला त्याचे फळ मिळते आणि तो दुर्लभ गतीस प्राप्त होतो II21II
सुतजी म्हणाले
गीतेचे हे सनातन माहात्म्य मी सांगितले. गीता पठणाच्या शेवटी जो याचे वाचन करतो त्याला वरील फळ मिळते II22II
इतिश्री वराहपुराणे श्रीमद् गीता महात्म्यं संपूर्ण
Be the first to comment